Monday, September 10, 2007

खाद्ययात्रा

रात्रपाळी करून पहाटेच्या पहिल्या गाडीने घरी परतणाऱ्या मुंबईकरांना एक दृश्‍य नेहमी दिसतं. ठिकठिकाणी चहाचे स्टॉल्सवाले चहाचा पहिला ग्लास रस्त्यावर "अर्पण' करत असतात! त्यांच्या दिवसाची, धंद्याची ती सुरुवात असते, आणि मुंबईच्या खाद्ययात्रेचीही!
एव्हाना काही तुरळक उडीपी हॉटेलही उघडू लागलेली असतात. इतक्‍या पहाटेही त्यांच्याकडे "एकही प्लेट मे दो का मजा' देणारी "शिरा-उपमा प्लेट' उपलब्ध असते, आणि ती खाणारे खवय्येही! ज्यांना सकाळी सकाळी खाणं नको वाटतं ते आपल्या दिवसाची सुरुवात करतात राजस्थानी भटाकडच्या "पानीकम'ने.
थोडं उशिरा म्हणजे इतर हॉटेलाची शटर वर जातात, त्या वेळी ऑफिसच्या दिशेने धावणाऱ्या अनेकांचा "नाश्‍ताब्रेक' तिथे होतो. ज्यांना ते परवडत नाही त्यांच्यासाठी हातगाडीवर पाच मिनिटांत डोसा किंवा गरमागरम सांबारात नरम इडली बुडवून देणारा अण्णा असतो. "साऊथ इंडिनय फूड' खायचं नसेल तर काही गाड्यांवर शिरा-पोहेही मिळतात. आणि आता तर उडीपी हॉटेलमध्येही "पोवा प्लेट' द्यायला सुरूवात केलीय. काही ठिकाणी तर या पोह्यांबरोबर चक्क सांबारही देतात म्हणे!
दुपार चढू लागली की वेध लागतात ते "लंच'चे. लंचसाठी सॅण्डविच, पिझ्झापासून झुणका-भाकर, घरगुती पोळी भाजीपर्यंत सारं काही उपलब्ध आहे, बसून खायचं असेल तर हॉटेलमध्ये आणि उभं राहून खायची तयारी असेल तर रस्त्यावरही!
संध्याकाळी चौपाटीवर तर भेळ-रगडा पॅटीसच्या गाड्या लागतातच, पण ठरलेल्या "इटिंग स्पॉट'वरही वडा-समोसा-भजी-भेळ-रगडा-सॅण्डविच खायला गर्दी उसळते! ती रात्री उशीरापर्यंत कायम असते. संध्याकाळी थोडं उशीरा पावभाजी, बुर्जीपाव, पायासूप आणि चायनीजच्या गाड्या लागायला सुरुवात होते. अनेकांचं "खाणं-पीणं' या गाड्यांवर अवलंबून असतं. स्टेशनपरिसरात तर अशा गाड्यांची रेलचेल असतेच. कामात गळ्यापर्यंत बुडालेले काही, जेव्हा रात्री शेवटची गाडी पकडून उपाशीपोटी स्टेशनवर उतरतात, तेव्हा हॉटेलं तर बंद झालेली असतात, पण त्यांना या गाड्या उपाशीपोटी राहू देत नाहीत!
निम्म्याहून जास्त मुंबईकर हॉटेलच्या या खाण्यावर, किंवा या रस्त्यावरच्या पोटभरीच्या पदार्थांवर जगतात. (किंवा त्यांना जगवतात!) मुंबईत अशी 15 हजाराहून (कितीतरी) जास्त हॉटेल्स आहेत. रस्त्यावरच्या "अन्नपुर्णा' गाड्यांची संख्याही 30 हजारावर गेलीय. (आणि सतत वाढतेच आहे) घरगुती पोळीभाजी सेंटर्सचा आणि खानावळींचा हिशेब आणखी वेगळाच. शिवाय कुठेना कुठे कसलेना कसले समारंभ सुरु असतातच. तिथेही लजीज खाना पेश होत असतो. आणि हो, घरगुती अन्न ऑफिसातल्या टेबलांवर पोहचवणारे डबेवाले राहिलेतच अजून...
म्हणजे जर कुणी हिशेब करायला बसलंच तर मुंबईकर दिवसाला टनावारी खाद्यपदार्थ फस्त करत असणार...आणि त्यातली उलाढाल? ती कित्येक कोटींची असणार. ही निश्‍चित आकडेवारी मिळणं थोडं कठीण आहे कारण हॉटेलमध्ये जेवणाऱ्या मुंबईकरांमध्येही अनेक "पोट'भेद असतात आणि 300 रुपयांच्या चहापासून दोन रुपयांच्या कटींगपर्यंत आणि काही हजाराच्या "टेन कोर्स क्वीझीन'पासून दहा रुपयांच्या राईसप्लेटपर्यंत खाण्या-पिण्याचं सारे प्रकार या मुंबापुरीत उपलब्ध आहेत. अपोलो बंदर, नरिमन पॉईंट या परिसरात तारांकित रुबाबात चांदीच्या काट्याचमच्याने मोजकं खाऊन भरमसाट पैसे मोजता येतात किंवा मसजिदबंदर स्टेशनजवळच्या फुटपाथवर फक्त दहा रुपयांत भरपेट राईसप्लेटही खाता येते!
एक गोष्ट खरी की दिवसाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा हा व्यवसाय खाण्याऱ्यांची आणि त्यांना खायला देणाऱ्यांची, अशी दोघांचीही पोटं भरत असतो!
पण योग्य डबे, योग्य ठिकाणी, योग्य वेळी पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांना, त्यांच्या घरचा डबा कोण पोहचवत असेल?