Monday, September 10, 2007

खाद्ययात्रा

रात्रपाळी करून पहाटेच्या पहिल्या गाडीने घरी परतणाऱ्या मुंबईकरांना एक दृश्‍य नेहमी दिसतं. ठिकठिकाणी चहाचे स्टॉल्सवाले चहाचा पहिला ग्लास रस्त्यावर "अर्पण' करत असतात! त्यांच्या दिवसाची, धंद्याची ती सुरुवात असते, आणि मुंबईच्या खाद्ययात्रेचीही!
एव्हाना काही तुरळक उडीपी हॉटेलही उघडू लागलेली असतात. इतक्‍या पहाटेही त्यांच्याकडे "एकही प्लेट मे दो का मजा' देणारी "शिरा-उपमा प्लेट' उपलब्ध असते, आणि ती खाणारे खवय्येही! ज्यांना सकाळी सकाळी खाणं नको वाटतं ते आपल्या दिवसाची सुरुवात करतात राजस्थानी भटाकडच्या "पानीकम'ने.
थोडं उशिरा म्हणजे इतर हॉटेलाची शटर वर जातात, त्या वेळी ऑफिसच्या दिशेने धावणाऱ्या अनेकांचा "नाश्‍ताब्रेक' तिथे होतो. ज्यांना ते परवडत नाही त्यांच्यासाठी हातगाडीवर पाच मिनिटांत डोसा किंवा गरमागरम सांबारात नरम इडली बुडवून देणारा अण्णा असतो. "साऊथ इंडिनय फूड' खायचं नसेल तर काही गाड्यांवर शिरा-पोहेही मिळतात. आणि आता तर उडीपी हॉटेलमध्येही "पोवा प्लेट' द्यायला सुरूवात केलीय. काही ठिकाणी तर या पोह्यांबरोबर चक्क सांबारही देतात म्हणे!
दुपार चढू लागली की वेध लागतात ते "लंच'चे. लंचसाठी सॅण्डविच, पिझ्झापासून झुणका-भाकर, घरगुती पोळी भाजीपर्यंत सारं काही उपलब्ध आहे, बसून खायचं असेल तर हॉटेलमध्ये आणि उभं राहून खायची तयारी असेल तर रस्त्यावरही!
संध्याकाळी चौपाटीवर तर भेळ-रगडा पॅटीसच्या गाड्या लागतातच, पण ठरलेल्या "इटिंग स्पॉट'वरही वडा-समोसा-भजी-भेळ-रगडा-सॅण्डविच खायला गर्दी उसळते! ती रात्री उशीरापर्यंत कायम असते. संध्याकाळी थोडं उशीरा पावभाजी, बुर्जीपाव, पायासूप आणि चायनीजच्या गाड्या लागायला सुरुवात होते. अनेकांचं "खाणं-पीणं' या गाड्यांवर अवलंबून असतं. स्टेशनपरिसरात तर अशा गाड्यांची रेलचेल असतेच. कामात गळ्यापर्यंत बुडालेले काही, जेव्हा रात्री शेवटची गाडी पकडून उपाशीपोटी स्टेशनवर उतरतात, तेव्हा हॉटेलं तर बंद झालेली असतात, पण त्यांना या गाड्या उपाशीपोटी राहू देत नाहीत!
निम्म्याहून जास्त मुंबईकर हॉटेलच्या या खाण्यावर, किंवा या रस्त्यावरच्या पोटभरीच्या पदार्थांवर जगतात. (किंवा त्यांना जगवतात!) मुंबईत अशी 15 हजाराहून (कितीतरी) जास्त हॉटेल्स आहेत. रस्त्यावरच्या "अन्नपुर्णा' गाड्यांची संख्याही 30 हजारावर गेलीय. (आणि सतत वाढतेच आहे) घरगुती पोळीभाजी सेंटर्सचा आणि खानावळींचा हिशेब आणखी वेगळाच. शिवाय कुठेना कुठे कसलेना कसले समारंभ सुरु असतातच. तिथेही लजीज खाना पेश होत असतो. आणि हो, घरगुती अन्न ऑफिसातल्या टेबलांवर पोहचवणारे डबेवाले राहिलेतच अजून...
म्हणजे जर कुणी हिशेब करायला बसलंच तर मुंबईकर दिवसाला टनावारी खाद्यपदार्थ फस्त करत असणार...आणि त्यातली उलाढाल? ती कित्येक कोटींची असणार. ही निश्‍चित आकडेवारी मिळणं थोडं कठीण आहे कारण हॉटेलमध्ये जेवणाऱ्या मुंबईकरांमध्येही अनेक "पोट'भेद असतात आणि 300 रुपयांच्या चहापासून दोन रुपयांच्या कटींगपर्यंत आणि काही हजाराच्या "टेन कोर्स क्वीझीन'पासून दहा रुपयांच्या राईसप्लेटपर्यंत खाण्या-पिण्याचं सारे प्रकार या मुंबापुरीत उपलब्ध आहेत. अपोलो बंदर, नरिमन पॉईंट या परिसरात तारांकित रुबाबात चांदीच्या काट्याचमच्याने मोजकं खाऊन भरमसाट पैसे मोजता येतात किंवा मसजिदबंदर स्टेशनजवळच्या फुटपाथवर फक्त दहा रुपयांत भरपेट राईसप्लेटही खाता येते!
एक गोष्ट खरी की दिवसाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा हा व्यवसाय खाण्याऱ्यांची आणि त्यांना खायला देणाऱ्यांची, अशी दोघांचीही पोटं भरत असतो!
पण योग्य डबे, योग्य ठिकाणी, योग्य वेळी पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांना, त्यांच्या घरचा डबा कोण पोहचवत असेल?

Saturday, August 25, 2007

कुणीतरी आठवण काढतंय

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरून
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरून
कावरंबावरं होण्यासारखं बिलकूल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका'सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव...आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकूल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्‍वास
घाबरून बिबरून जाण्यासारखं बिलकूल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगून द्यावं काळजीसारखं बिलकूल काही नाही
""कुणीतरी आठवण काढतंय...
बाकी काही नाही....

Tuesday, August 14, 2007

झेंडावंदन!

डायरी



15 ऑगस्टच्या सकाळी सकाळी झोपेत असताना कुणीतरी उठवायला यायचं आणि असंच झोपेतल्या बाकीच्या सगळ्यांना उठवून मग गच्चीत जाऊन झेंडावंदन करायचं हा नेहमीचा परिपाठ.
पण त्या दिवशी समीरच्या डोक्‍यात 14 तारखेच्या रात्री दीडचं नाटक बघायची आयडिया आली. नाटक दामोदरला होतं. "रानभूल.' सगळ्यांना कल्पना आवडली. रात्री दहा-अकराच्या सुमारास कॉलेजकट्ट्यावरच भेटायचं ठरलं.
रात्री जेवून आरामात कट्ट्यावर आलो तर कुणीच दिसेना. कॉलेजचा गुरखा मात्र येऊन गेला. "जाव शाब, घर जाव, इतना देर कॉलेज रैना ठीक नयी' सांगून गेला. त्याला समजावण्याच्या फंदात पडलो नाही. पण कॉलेजवर पडीक असणारी मंडळीही बायबाय करून जायला लागल्यावर संयम सुटला. रमणच्या घरी फोन केला. तर तो कधीच निघाल्याचं कळलं. तेवढ्यात अभय मला शोधताना दिसला. म्हटलं शोधू दे... बऱ्याच वेळाने त्याला पत्ता लागला माझा. वैतागून म्हणाला, "हाक मारता येत नाही रे तुला? तोंड नाही?'
म्हटलं, "बघता येत नाही नीट? डोळे नाहीत?'
म्हणाला, "अंधारात दिसायला हवास ना तू शाम्या...'
"शाम्या? हे काय नवीन?'
"शाम्या म्हणजे शामरंगवाला... थोडक्‍यात काळा..' हसतानाच समीर आला, रमणही मागोमाग उगवला. त्याची वाट पाहून वैतागून घरी फोन केल्याचं त्याला सांगितलं, तर वैतागला. घरी गेल्यावर बाबा वैतागणार म्हणून...
मग एका दुकानाच्या कट्ट्यावर बोलत बसलो. मस्त बोलत बसलो असतो बहुधा पहाटेपर्यंत, तेवढ्यात एकजण अंथरुण घेऊन आला तिथे. आम्ही बहुतेक त्याच्या बेडवर बसलो होतो. निमूट उठलो आणि परेलच्या दिशेने चालायला लागलो.
जेऊन आलो होतो, तरी एका गाडीवर पुन्हा खाल्लं. रात्रभराची बेगमी म्हणून. मग दत्ताकडे निघालो. साडेबारा वाजले होते. दत्ता "दामोदर'च्या मुख्य गेटसमोर उभा राहणार होता. तिथे नव्हता. बाजूलाच त्याचं घर. त्याच्या खिडकीच्या खाली जाऊन "दत्ता' हे नाव येणारी वाक्‍यं मोठमोठ्यानं बोलत बसलो (ही अभयची आयडिया. दत्ता वर जागा असेल तर ऐकून खाली येईल असं त्याचं म्हणणं.) पण "दत्त दत्त दत्त, दत्ताची गाय' ही कविता बोंबलून म्हटली तरी दत्ता येईना. शेवटी दरवाजाच ठोकूया म्हटलं. वर गेलो तर त्याच्या पॅसेजमध्ये केवढातरी काळोख. काही दिसेना आणि अभयचं म्हणणं तिथे कुणी झोपलेले असतील तर..? मग कुणाच्या तरी अंगावर पाय पडून काय काय होईल याची कल्पनाचित्रं काढून हसत बसलो. बहुधा त्या हसण्याच्या आवाजाने त्या अंधारात एक दरवाजा उघडला. एक वैतागलेला माणूस बाहेर आला. त्याने आम्हाला "कोण हवेय' ते विचारून घेऊन त्याने दत्ताच्या दरवाजावर जोरात थाप मारली आणि पुन्हा जाऊन झोपला. पुन्हा आम्ही अंधारात. तेवढ्यात बाहेर कुणीही झोपलेलं नाही हे कळलं होतंच. पण त्या अंधारात त्याने नेमक्‍या कोणत्या दरवाजावर थाप मारली तेच कळेना. तेवढ्यात एक दरवाजा उघडला आणि दस्तुरखुद्द दत्ताच शर्ट घालत बाहेर आला "नाय रे यार, रात्री गजर लाऊन झोपलो बाराचा...'
"मग गजर झालाच नाही?'
"झाला रे, पण मीच बंद करून परत झोपलो ना...' सगळ्यांनी त्याला फटके दिल्यावर थिएटरमध्ये गेलो. नाटक हाऊस फुल्ल होतं.
नाटक पहाटे संपलं. आवडलं.
मग इराण्याच्या हॉटेलमध्ये जाऊन त्या नाटकाचं रसग्रहण सुरू झालं. दरम्यान तीन-चार वेळा चहा झाला. घरी निघालो तेव्हा साडेसात-आठ वाजले होते.
साडेआठला घरी पोहोचलो तेव्हा म्हटलं, आता "झेंडावंदन' करूनच झोपू. सगळ्यांना उठवायला सुरुवात केली. सगळे चकीत. पण आमचे सेक्रेटरी मात्र खुश झाले. पहिल्यांदाच नऊ वाजता झेंडावंदन होणार म्हणून...
झेंडावंदन आटोपल्यावर त्यांना या चमत्कारामागचं रहस्य सांगितलं. तर म्हणाले, "पुढच्या चौदा ऑगस्टला नाटक मी दाखवणार...!'

Monday, August 13, 2007

ही मुंबई


ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...
एक शहर आहे जगात, म्हणतात ते फार वेगळे आहे...
जे मला अनुभवले तेथे राहून, ते तुम्हाला सांगतो आहे.
पण, प्रत्येकाची सांगायची एक पद्धत असते
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

सकाळी उठणे, हे सुद्धा एक काम आहे...
रात्रीची झोप, हा काल्पनिक आराम आहे
त्या उशीवर मला झोप येत नाही...
माझ्या डोक्‍याला ट्रेनच्यापत्र्याची सवय आहे
जिथे उशीची माया, लोखंडी पत्र्यात मिळते
ही मुंबई आहे, मुंबई, इथे असेच असते...

दात घासणे, अंघोळ करणे, याला पुरेसा वेळ नाही...
नाश्‍ता करताना, तयारी करणे यासारखा मजेशीर खेळ नाही.
बूट घालायच्या आधी, धावत देवासमोर जायचे
EMINEM ला देखील जमणार नाही, असे "साष्टांग नमन' म्हणायचे
देवासमोर एक मिनीट, हीच देव पूजा असते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...
बिल्डिंगच्या पायऱ्या उतरेपर्यंत, काहीतरी विसरल्याचे भान होते...
आणि हा आज काय विसरला आहे याचे अख्या बिल्डिंगला ज्ञान होते.
"नीट जा', "सांभाळून ये', हे आईच्या हातवाऱ्यानेसुद्धा कळते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

बिल्डिंगचा गेट सोडला, की रांगांची रांग लागते,
रिक्षा, बस, ट्रेनचे तिकीट, काहीही कारण चालते.
रस्त्यावरून चालणारा प्रत्येकजण धावत असतो,
मिनिटाला 100 पाऊले असा इथे हिशेब असतो.
रस्ता आपल्या बापाचा समजून चालायचे असते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

शिव्या देत, शिव्या खात, प्लॅटफॉर्मवर पोचायचे असते
मुंग्यांमधली साखर शोधावी, असे मित्रांना शोधायचे असते
ट्रेनमधले मित्र, खरे मैत्रीला जागणारे असतात...
एकामुळे तिघांना जागा मिळावी, असे जागा अडवून बसतात.
रिझर्वेशन नसूनही, प्रत्येकाची जागा FIXED असते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

काहींच्या दोन डब्यांपैकी एक डब्बा ट्रेनमध्येच उघडतो,
"तेरी भाभी हाऊसवाईफ है रे' असे म्हणून तो पण शेफारतो.
"भाभी' वर दया येण्याचे काही कारण नाही...
"कालची भाजी' संपवायचा तिचा हा सोप्पा मार्ग असतो
पोट भरण्यासाठी नव्हे, तर वाटून खाण्यासाठी खायचे असते,
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

ट्रेनमधून उतरणे, हासुद्धा एक प्रवास असतो...
आणि कोणावर नसून, पुढे उभ्या असणाऱ्यावर अवलंबून असतो
पाठच्याला उतरायचे आहे, म्हणून तोही बेफिकीर असतो...
अशा या घट्ट विश्‍वासामुळेच प्रत्येकजण आपले ठिकाण गाठतो.
बाहेर पडल्यावर पहिले काम, शर्टाच्या सुरकुत्या मोजणे असते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

एवढे युद्ध ज्यासाठी केले ते ठिकाण समोर असते,
कोणासाठी अभ्यास, कोणासाठी पगार, तर कुणासाठी "नुसता त्रास' असते
आगमन होता क्षणीच निघण्याची वेळ ठरवायची असते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

घरी परतण्याचा विचारच फार आनंददायी असतो,
प्रत्येकाचा परतण्याचा मार्ग मात्र वेगळा असतो
प्रेयसी बरोबर समुद्रकाठ किंवा गार्डनमधली किलबिल...
मित्रांबरोबर "बार' नाहीतर "KINGFISHER' चा छोटा रिफील
नाहीतर थेट घरी जाऊन क्रिकेट मॅच बघायची असते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

आईच्या हातचा चहा हेच घरी पोचण्याचे समाधान...
तिची सिरीयल माझी मॅच यासाठी रिमोटची ताणाताण
ब्रेक वगळून एकाच वेळी तीन सिरीयल पाहिल्या जातात...
आणि जेवणाचे दाणे सर्वात आधी त्या रिमोटच्या घशात जातात.
जेवणाची वेळ ही फक्त टीव्हीवर अवलंबून असते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

पण सिरीयल बघायचे बंधन मात्र कुणाला नसते...
कुणाकडे कट्टा, कुणाकडे इंटरनेट असे साधन असते.
कुठे KEYBOARD ची किटपिट, कुठे कट्ट्यावरचा हशा असतो...
पण, जेवणाची हाक' हा EMERGENCY ALARM' असतो.
लोणच्या, पापडासकट अख्ख्या दिवसाची कहानी तोंडी असते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

जेवणानंतर झोप अगदी वाईट सवय आहे...
म्हणूनच COLONY म धून फेरफटका आता आमची गरज आहे
या एका तासात COLONY तल्या नव्या-जुन्याची खबर होते...
आणि आपण ही त्याचा एक भाग आहोत याची गोड जाणीव होते
झोपण्यासाठी नव्हे तर सकाळी उठण्यासाठी घरी परतायचे असते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

मोबाईल, इंटरनेट यांच्याबरोबर बिछाना असतो
पुन्हा एकदा देवापुढे EMUNEM आणि डोळ्यांना आराम असतो.
सकाळचा अलार्म थोडी उशिरा वाजावा, हेच एकमेव स्वप्न असते...
पण मुंबईतला एकमेव प्रामाणिक, अशी घड्याळ्याची ख्याती असते.
देव देवघरी असला तरी त्याचे सर्व काम इथे घड्याळ करते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

असा हा नित्यक्रम सोम. ते शुक्र. असतो
पण बाकीचे दोन दिवस आमचा दिनक्रम बदलतो.
जे पाच दिवसांत भेटले नाहीत, असे मित्र भेटतात...
थेटर, पब, बीच, टेरेस सर्व ठिकाणे जागवतात
"आईला एक दिवस आराम' हे रात्री बाहेर जेवणाचे कारण असते
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

असा हा आठवडा, त्याचेच महिने घडावे...
दिवसातील 24 तासही इथे कामी पाडावे
अशी ही श्रमाची बॅंक, जथे तक्रार काऊंटर नाही...
मैत्रीचे व्याज मिळत राहाते आणि जास्त तोटा ही नाही
शोधणाऱ्यासाठी सगळे आहे, फक्त वेळ मात्र सापडत नसते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

Monday, August 6, 2007

शब्दांच्या अलिकडले

दिवस तुझे हे....
मुळ गीत - मंगेश पाडगावकर

दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे...

----

दिवस तुझे हे फुगायाचे
मोजून मापून जेवायचे ।।धृ।।

माझी तु लाडकी राणी
नको ग खाऊस लोणी
पाण्यात लिंबाला पिळायचे ।।1।।
साजूक तूपाची धार
वाढवी कॅलरी फार
पोटात सॅलड भरायचे ।।2।।
प्रभाती फिराया जाणे
वाटेत धाप लागणे
दमून जरासे टेकायचे ।।3।।
वजन वाढते फार
सोसेना काट्याला भार
कळेना काय ते करायचे।।4।।
आपुल्या घराच्या पाशी
फिर तू गडे जराशी
हालत-चालत रहायचे ।।5।।

-----------------

मूळ गीत - भालजी पेंदाराकार

ऐरणीच्या देवा तुला...

परदेशात नोकरीला जाणारे म्हणतात...
"कॉम्प्युटर'च्या देवा तुला
"बाईट' "बाईट' वाहू दे
डॉलर रुपी माया तुझी
आम्हावरी राहू दे ।।धृ।।

लेणं लेवू "एच वन' (व्हिसा)चं
फ्लाईट धरू स्वीस एअरचं
युनिक्‍स, जावा, ओराकल
"ग्रीनकार्ड' मिरॅकल लवरकरच होऊ दे।।1।।
रिसेशनची पीडा टळो,
"व्हॅली'मध्ये घर मिळो
देशप्रेम माझं वेळोवेळी
महाराष्ट्र मंडळात उतू जाऊ दे ।।2।।

--------------------------------

तू वेडा कुंभार

मूळ कविता - ग। दि. माडगुळकर

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला तू वेडा कुंभार ।।धृ।।

--

फिरत्या खुर्चीवरती देसी केसाला आकार
नाभिका तू ऐसा हुश्‍शार ।।धृ।।
तेलपाणी, मशीन वस्तरा
तूच मारीशी गरम फवारा
आकारच मग ये डोक्‍याला
तुला स्वतःच्या कलाकृतीची नसे खंत ना हारा ।।1।।
शिराशिरांचे रुप आगळे
र्प्रत्येकाचे भांग वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
माथी कुणाच्या नसते पाणी, कुणी तेलकट फार ।।2।।
तूच वळविसी, तूच कापीसी
कुरवाळीसी तू, तूच ओठीसी
आरसे दावून काय साधीसी
घेसी पैसे तरीही लुटसी, रम्य केशसंभार ।।3।।

-----------------------

शब्दांच्या पलिकडले

मूळ कविता - मंगेश पाडगावकर

शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियले आणिक, घडू नये ते घडले ।।धृ।।

----

दातांच्या पलिकडले...
दातांवाचून अडले सारे, दातांच्या पलिकडले,
प्रथम जरासे किडले आणिक पडू नये ते पडले ।।धृ।।
दर्द नवा दातास मिळाला
सूज नवी अन्‌ शूल निराळा
त्या दिवशी तर प्रथमच माझे गाल दोन्ही अवघडले।।1।।
आठवले अवसेच्या रात्री
लक्ष दर्द ठसठसले गात्री
स्थितीत तसल्या, डेन्टिसांचे महत्त्व मज उलगडले ।।2।।

Wednesday, August 1, 2007

कोट बनियान

- समोरच्या मृत्यूला नाटक करून दाखवणारा हा इंग्रज! साक्षात यमदूतालादेखील साहेबाला उचलायच्या आधी अपॉइंटमेंण्ट घेऊन, दारावरची घंटी वाजवून, आपल्या नावाचे कार्ड पाठवून-हॅट आणि छत्री कोपऱ्यातल्या स्टॅंडवर ठेवून येत असेल, आणि तो मिनीटभर आधी आला साहेबाचा बटलर त्याच्यापुढे सकाळचा टाइम्स टाकून मिनीटभर वाट पहायला लावीत असेल! (अपूर्वाई)
- भारताचे हे महान प्रवेशद्वार दिव्यांच्या झगमगत्या तोरणांनी आमचे स्वागत करीत होते. पोटच्या दुर्देवी दारिद्रयाची कोळिष्टके घराण्याच्या अब्रूवर पांघरूण घालणाऱ्या उदारात्म्या अंधाराने आपल्या पांघरूणात दडवली होती.(अपूर्वाई)
- एखाद्या माथेफिरूच्या डोक्‍यात जर नव्या पर्जन्यास्त्राची किंवा वाय्वस्त्राची कळ फिरवण्याची लहर आलीच तर त्या करंगळीभर सुवेजच्या भोवती काय पण साऱ्या जगाचे वाळवंट झाले असते. आणि ह्या प्रळयातून वाचलेल्या एखाद्या नखाएवढ्या तृणपात्यातून पुन्हा नव्या सृजनाची सुरूवात झाली असती.(अपूर्वाई)

Monday, July 30, 2007

मी माझा?

मी माझा?

इथे वेडे असण्याचे
खूप फायदे आहेत
शहाण्यांसाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत।

-

इथे स्मगलिंग करण्याचे
खूप फायदे आहेत।
वडापाव विकणाऱ्यांसाठी
काटेकोर कायदे आहेत।

आता मलाही लागलय जमायला
तुझ्यासारखं वागणं
समोर आलीस की गप्प रहाणं
रात्री कुढत जागणं



आता मलाही लागलय जमायला
तुझ्यासारखं वागणं
बिल समोर आलं की
हात धुवायला जाणं


तु विझत असताना तुझ्याभोवती
मी ओंजळ धरली
तू तेवत राहिलास नी प्रकाशाने
माझी ओंजळ भरली


शेंगदाणे खाताना तू
मी तुझ्यासमोर ओंजळ धरली।
तू तर खातच राहिलास, नी फोलपटांनी
माझी ओंजळ भरली


माझ्या प्रत्येक क्षणात
तुझा वाटा अर्धा आहे।
भूतकाळ आठवायचा तर
तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे


माझ्या प्रत्येक बिलात
तुझा वाटा अर्धा आहे,
पण भरायची वेळ आली,
की पळून जाण्याची स्पर्धा आहे।


ज्या गोष्टींची भीती होती
तेथ होऊन बसलंय
तुझ्याकडे पाठवत नाही म्हणून
माझं मन माझ्यावर रुसलय


ज्या गोष्टीची भीती होती
तेथ होऊन बसलंय।
बायकोच्या मैत्रिणीवरच
माझ मन बसलंय

एकदा मला ना तू
माझी वाट पाहाताना पहायचंय
तेवढ्यासाठी आडोशाला
हळूच लपून रहायचंय

कधीतरी मला तुला
गप्प बसलेलं पहायचंय
बाकी कधी शक्‍य नाही, म्हणून
जेवताना जवळ रहायचंय