Tuesday, August 14, 2007

झेंडावंदन!

डायरी15 ऑगस्टच्या सकाळी सकाळी झोपेत असताना कुणीतरी उठवायला यायचं आणि असंच झोपेतल्या बाकीच्या सगळ्यांना उठवून मग गच्चीत जाऊन झेंडावंदन करायचं हा नेहमीचा परिपाठ.
पण त्या दिवशी समीरच्या डोक्‍यात 14 तारखेच्या रात्री दीडचं नाटक बघायची आयडिया आली. नाटक दामोदरला होतं. "रानभूल.' सगळ्यांना कल्पना आवडली. रात्री दहा-अकराच्या सुमारास कॉलेजकट्ट्यावरच भेटायचं ठरलं.
रात्री जेवून आरामात कट्ट्यावर आलो तर कुणीच दिसेना. कॉलेजचा गुरखा मात्र येऊन गेला. "जाव शाब, घर जाव, इतना देर कॉलेज रैना ठीक नयी' सांगून गेला. त्याला समजावण्याच्या फंदात पडलो नाही. पण कॉलेजवर पडीक असणारी मंडळीही बायबाय करून जायला लागल्यावर संयम सुटला. रमणच्या घरी फोन केला. तर तो कधीच निघाल्याचं कळलं. तेवढ्यात अभय मला शोधताना दिसला. म्हटलं शोधू दे... बऱ्याच वेळाने त्याला पत्ता लागला माझा. वैतागून म्हणाला, "हाक मारता येत नाही रे तुला? तोंड नाही?'
म्हटलं, "बघता येत नाही नीट? डोळे नाहीत?'
म्हणाला, "अंधारात दिसायला हवास ना तू शाम्या...'
"शाम्या? हे काय नवीन?'
"शाम्या म्हणजे शामरंगवाला... थोडक्‍यात काळा..' हसतानाच समीर आला, रमणही मागोमाग उगवला. त्याची वाट पाहून वैतागून घरी फोन केल्याचं त्याला सांगितलं, तर वैतागला. घरी गेल्यावर बाबा वैतागणार म्हणून...
मग एका दुकानाच्या कट्ट्यावर बोलत बसलो. मस्त बोलत बसलो असतो बहुधा पहाटेपर्यंत, तेवढ्यात एकजण अंथरुण घेऊन आला तिथे. आम्ही बहुतेक त्याच्या बेडवर बसलो होतो. निमूट उठलो आणि परेलच्या दिशेने चालायला लागलो.
जेऊन आलो होतो, तरी एका गाडीवर पुन्हा खाल्लं. रात्रभराची बेगमी म्हणून. मग दत्ताकडे निघालो. साडेबारा वाजले होते. दत्ता "दामोदर'च्या मुख्य गेटसमोर उभा राहणार होता. तिथे नव्हता. बाजूलाच त्याचं घर. त्याच्या खिडकीच्या खाली जाऊन "दत्ता' हे नाव येणारी वाक्‍यं मोठमोठ्यानं बोलत बसलो (ही अभयची आयडिया. दत्ता वर जागा असेल तर ऐकून खाली येईल असं त्याचं म्हणणं.) पण "दत्त दत्त दत्त, दत्ताची गाय' ही कविता बोंबलून म्हटली तरी दत्ता येईना. शेवटी दरवाजाच ठोकूया म्हटलं. वर गेलो तर त्याच्या पॅसेजमध्ये केवढातरी काळोख. काही दिसेना आणि अभयचं म्हणणं तिथे कुणी झोपलेले असतील तर..? मग कुणाच्या तरी अंगावर पाय पडून काय काय होईल याची कल्पनाचित्रं काढून हसत बसलो. बहुधा त्या हसण्याच्या आवाजाने त्या अंधारात एक दरवाजा उघडला. एक वैतागलेला माणूस बाहेर आला. त्याने आम्हाला "कोण हवेय' ते विचारून घेऊन त्याने दत्ताच्या दरवाजावर जोरात थाप मारली आणि पुन्हा जाऊन झोपला. पुन्हा आम्ही अंधारात. तेवढ्यात बाहेर कुणीही झोपलेलं नाही हे कळलं होतंच. पण त्या अंधारात त्याने नेमक्‍या कोणत्या दरवाजावर थाप मारली तेच कळेना. तेवढ्यात एक दरवाजा उघडला आणि दस्तुरखुद्द दत्ताच शर्ट घालत बाहेर आला "नाय रे यार, रात्री गजर लाऊन झोपलो बाराचा...'
"मग गजर झालाच नाही?'
"झाला रे, पण मीच बंद करून परत झोपलो ना...' सगळ्यांनी त्याला फटके दिल्यावर थिएटरमध्ये गेलो. नाटक हाऊस फुल्ल होतं.
नाटक पहाटे संपलं. आवडलं.
मग इराण्याच्या हॉटेलमध्ये जाऊन त्या नाटकाचं रसग्रहण सुरू झालं. दरम्यान तीन-चार वेळा चहा झाला. घरी निघालो तेव्हा साडेसात-आठ वाजले होते.
साडेआठला घरी पोहोचलो तेव्हा म्हटलं, आता "झेंडावंदन' करूनच झोपू. सगळ्यांना उठवायला सुरुवात केली. सगळे चकीत. पण आमचे सेक्रेटरी मात्र खुश झाले. पहिल्यांदाच नऊ वाजता झेंडावंदन होणार म्हणून...
झेंडावंदन आटोपल्यावर त्यांना या चमत्कारामागचं रहस्य सांगितलं. तर म्हणाले, "पुढच्या चौदा ऑगस्टला नाटक मी दाखवणार...!'

1 comment:

Anonymous said...

he kay aahe. diary konachi?
jara spast kara ki rao!