Monday, August 13, 2007

ही मुंबई


ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...
एक शहर आहे जगात, म्हणतात ते फार वेगळे आहे...
जे मला अनुभवले तेथे राहून, ते तुम्हाला सांगतो आहे.
पण, प्रत्येकाची सांगायची एक पद्धत असते
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

सकाळी उठणे, हे सुद्धा एक काम आहे...
रात्रीची झोप, हा काल्पनिक आराम आहे
त्या उशीवर मला झोप येत नाही...
माझ्या डोक्‍याला ट्रेनच्यापत्र्याची सवय आहे
जिथे उशीची माया, लोखंडी पत्र्यात मिळते
ही मुंबई आहे, मुंबई, इथे असेच असते...

दात घासणे, अंघोळ करणे, याला पुरेसा वेळ नाही...
नाश्‍ता करताना, तयारी करणे यासारखा मजेशीर खेळ नाही.
बूट घालायच्या आधी, धावत देवासमोर जायचे
EMINEM ला देखील जमणार नाही, असे "साष्टांग नमन' म्हणायचे
देवासमोर एक मिनीट, हीच देव पूजा असते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...
बिल्डिंगच्या पायऱ्या उतरेपर्यंत, काहीतरी विसरल्याचे भान होते...
आणि हा आज काय विसरला आहे याचे अख्या बिल्डिंगला ज्ञान होते.
"नीट जा', "सांभाळून ये', हे आईच्या हातवाऱ्यानेसुद्धा कळते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

बिल्डिंगचा गेट सोडला, की रांगांची रांग लागते,
रिक्षा, बस, ट्रेनचे तिकीट, काहीही कारण चालते.
रस्त्यावरून चालणारा प्रत्येकजण धावत असतो,
मिनिटाला 100 पाऊले असा इथे हिशेब असतो.
रस्ता आपल्या बापाचा समजून चालायचे असते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

शिव्या देत, शिव्या खात, प्लॅटफॉर्मवर पोचायचे असते
मुंग्यांमधली साखर शोधावी, असे मित्रांना शोधायचे असते
ट्रेनमधले मित्र, खरे मैत्रीला जागणारे असतात...
एकामुळे तिघांना जागा मिळावी, असे जागा अडवून बसतात.
रिझर्वेशन नसूनही, प्रत्येकाची जागा FIXED असते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

काहींच्या दोन डब्यांपैकी एक डब्बा ट्रेनमध्येच उघडतो,
"तेरी भाभी हाऊसवाईफ है रे' असे म्हणून तो पण शेफारतो.
"भाभी' वर दया येण्याचे काही कारण नाही...
"कालची भाजी' संपवायचा तिचा हा सोप्पा मार्ग असतो
पोट भरण्यासाठी नव्हे, तर वाटून खाण्यासाठी खायचे असते,
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

ट्रेनमधून उतरणे, हासुद्धा एक प्रवास असतो...
आणि कोणावर नसून, पुढे उभ्या असणाऱ्यावर अवलंबून असतो
पाठच्याला उतरायचे आहे, म्हणून तोही बेफिकीर असतो...
अशा या घट्ट विश्‍वासामुळेच प्रत्येकजण आपले ठिकाण गाठतो.
बाहेर पडल्यावर पहिले काम, शर्टाच्या सुरकुत्या मोजणे असते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

एवढे युद्ध ज्यासाठी केले ते ठिकाण समोर असते,
कोणासाठी अभ्यास, कोणासाठी पगार, तर कुणासाठी "नुसता त्रास' असते
आगमन होता क्षणीच निघण्याची वेळ ठरवायची असते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

घरी परतण्याचा विचारच फार आनंददायी असतो,
प्रत्येकाचा परतण्याचा मार्ग मात्र वेगळा असतो
प्रेयसी बरोबर समुद्रकाठ किंवा गार्डनमधली किलबिल...
मित्रांबरोबर "बार' नाहीतर "KINGFISHER' चा छोटा रिफील
नाहीतर थेट घरी जाऊन क्रिकेट मॅच बघायची असते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

आईच्या हातचा चहा हेच घरी पोचण्याचे समाधान...
तिची सिरीयल माझी मॅच यासाठी रिमोटची ताणाताण
ब्रेक वगळून एकाच वेळी तीन सिरीयल पाहिल्या जातात...
आणि जेवणाचे दाणे सर्वात आधी त्या रिमोटच्या घशात जातात.
जेवणाची वेळ ही फक्त टीव्हीवर अवलंबून असते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

पण सिरीयल बघायचे बंधन मात्र कुणाला नसते...
कुणाकडे कट्टा, कुणाकडे इंटरनेट असे साधन असते.
कुठे KEYBOARD ची किटपिट, कुठे कट्ट्यावरचा हशा असतो...
पण, जेवणाची हाक' हा EMERGENCY ALARM' असतो.
लोणच्या, पापडासकट अख्ख्या दिवसाची कहानी तोंडी असते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

जेवणानंतर झोप अगदी वाईट सवय आहे...
म्हणूनच COLONY म धून फेरफटका आता आमची गरज आहे
या एका तासात COLONY तल्या नव्या-जुन्याची खबर होते...
आणि आपण ही त्याचा एक भाग आहोत याची गोड जाणीव होते
झोपण्यासाठी नव्हे तर सकाळी उठण्यासाठी घरी परतायचे असते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

मोबाईल, इंटरनेट यांच्याबरोबर बिछाना असतो
पुन्हा एकदा देवापुढे EMUNEM आणि डोळ्यांना आराम असतो.
सकाळचा अलार्म थोडी उशिरा वाजावा, हेच एकमेव स्वप्न असते...
पण मुंबईतला एकमेव प्रामाणिक, अशी घड्याळ्याची ख्याती असते.
देव देवघरी असला तरी त्याचे सर्व काम इथे घड्याळ करते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

असा हा नित्यक्रम सोम. ते शुक्र. असतो
पण बाकीचे दोन दिवस आमचा दिनक्रम बदलतो.
जे पाच दिवसांत भेटले नाहीत, असे मित्र भेटतात...
थेटर, पब, बीच, टेरेस सर्व ठिकाणे जागवतात
"आईला एक दिवस आराम' हे रात्री बाहेर जेवणाचे कारण असते
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

असा हा आठवडा, त्याचेच महिने घडावे...
दिवसातील 24 तासही इथे कामी पाडावे
अशी ही श्रमाची बॅंक, जथे तक्रार काऊंटर नाही...
मैत्रीचे व्याज मिळत राहाते आणि जास्त तोटा ही नाही
शोधणाऱ्यासाठी सगळे आहे, फक्त वेळ मात्र सापडत नसते...
ही मुंबई आहे मुंबई, इथे असेच असते...

1 comment:

झंप्या said...

हे झोलर कुठला रे टू? बांद्र कॉलनीतला काय?